छुप्या युद्धाचा भाग   

नंदकुमार काळे 

काश्मीरमध्ये पर्यटन हंगाम जोरात सुरू असताना आणि दोन जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असताना पहलगाममध्ये लष्करी पेहेरावात आलेल्या भेकड दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटकांची हत्या करण्यात आली. थेट युद्धात भारताला हरवता येत नसल्याने ‘छुपे युद्ध’ करण्यावर पाकिस्तानचा भर आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देऊनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे.
 
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतरही काश्मीर तुलनेने शांतच होते. तिथल्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. काश्मीरचा पर्यटन उद्योग बहरात आला होता. चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झाले होते. राज्यात गुंतवणूक वाढत होती. काश्मीरबाहेरच्या लोकांचे रोजगारानिमित्त काश्मीरमध्ये स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले होते.  दहशतवादी गटात सामील होण्याचे स्थानिक तरुणांचे प्रमाण कमी झाले होते. दहशतवाद्यांना आश्रय मिळणे कमी झाले होते. 
 
तेथील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे असे वाटत असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादी रावळकोटमधून कट रचत होते. भारतात घुसून अतिरेकी मोठे हत्याकांड करणार असल्याचा सुगावा सुरक्षा दलांना लागू नये, हे मात्र आश्‍चर्य आहे. काश्मिरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जण  ठार झाले. त्यात बहुतांश पर्यटक होते. दोन परदेशी तर दोन स्थानिक नागरिक आहेत. महाराष्ट्रातील सहाजणांचा त्यात समावेश आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी गट ‘लष्कर-ए-तोयबा’ची शाखा असलेल्या ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.  
 
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारताच्या दौर्‍यावर असताना ही घटना घडली. पूर्वी बिल क्लिटंन अमेरिकेचे अध्यक्ष असताना भारत दौर्‍यावर येण्याआधी काश्मीरमध्ये ३५ शीखांचे  हत्याकांड घडवून आणण्यात आले होते. श्रीनगरजवळ घडलेल्या या घटनेनंतर २५ वर्षानंतरचा पहलगाममधील हा दुसरा मोठा हल्ला आहे. पुलवामा येथे ४४ जवानांना आयईडी स्फोटात हौतात्म्य आले होते. तो हल्ला आणि आताच्या हल्ल्यात फरक आहे. त्यात जवानांना लक्ष्य  करण्यात आले होते, तर आताच्या हल्ल्यात सामान्य पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. काश्मिरच्या अर्थव्यवस्थेवर हा हल्ला आहे.  जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हा दहशतवादी हल्ला अलीकडच्या काही वर्षांमधील नागरिकांवरील सर्वाात  मोठा हल्ला  असल्याचे म्हटले आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांच्या घटनेचा निषेध केला. ते रस्त्यावर आले. लोकांनी मेणबत्त्या पेटवून कँडल मार्च काढला. काश्मिरचा लाल चौक सतत उपक्रमांनी गजबजलेला असतो. तो रिकामा दिसत होता. 
 
पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेजवळ पाकिस्तानच्या संशयास्पद लष्करी हालचालींबाबत ‘सोशल मीडिया’वर अनेक दावे समोर आले. या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. त्यांनी विमानतळावर उतरल्यावर  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यांशी चर्चा केली. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला होता. बालाकोटवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध तोडण्यात आले. तरीही पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबायला तयार नाही. 
 
पहलगामची घटना काश्मीर खोर्‍यातील अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. गेल्या १५ वर्षांचा आढावा घेतल्यास अशा प्रकारचा हा अकरावा मोठा हल्ला आहे. यामध्ये आतापर्यंत २२७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या दि.१६ रोजी परदेशी पाकिस्तानी नागरिकांचा एक समारंभ इस्लामाबादेत पार पडला.त्यात पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख जनरल असीम  मुनीर यांचे भाषण झाले होते.काश्मीर ही आमची मुख्य रक्तवाहिनी आहे आम्ही काश्मीरला विसरलेलो नाही, अशा आशयाची विधाने त्यांनी या वेळी केली होती. नागरी कार्यक्रमात लष्कराच्या प्रमुखांचे भाषण का व्हावे? हा प्रश्‍न आहे. पण पाकिस्तानी लष्कराचे व त्या मुळे तेथील सरकारचे अस्तित्वच काश्मीर या मुद्द्यावर टिकून आहे हे वास्तव आहे.त्या भाषणानंतर लगेच हा हल्ला होणे हा योगायोग नाही.हल्लेखोरांकडे ‘ए के-४७’ व एम-४ अशी आधुनिक शस्त्रे होती. ती त्यांना पाकिस्तानी लष्कराने पुरवली असणार यात शंका नाही. 
 
अतिरेक्यांनी जाणूनबुजून धर्माचा उल्लेख केला;भारतात धार्मिक विद्वेष निर्माण करणे हा त्यामागचा त्यांचा हेतू  असला तरी देशवासीयांनी या काळात शांतता व एकोपा पाळून त्यांचा हा हेतू उधळून लावणेही गरजेचे आहे.पहलगामच्या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ‘टीआरएफ’ ही दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’शी संलग्न आहे. या हल्ल्याचा  सूत्रधार  सैफुल्ला खालिद  हा दहशतववादी असल्याचा दावा केला जात आहे. तोच जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबा आणि ‘टीआरएफ’च्या दहशतवादी कारवाया करत आहे. सैफुल्ला खालिद हा दहशतवादी हाफिज सईदच्या खूप जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिशान कारचा शौकीन असलेला सैफुल्ला आधुनिक सुरक्षा कवचाखाली राहतो. तो ‘लष्कर-ए-तोयबा’चा उपप्रमुख असून सैफुल्ला कसुरी या नावाने ओळखला जातो. देशातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव पुढे आले आहे. तो अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या लष्कर दहशतवाद्यांच्या सुरक्षेखाली राहतो. 
 
सैफुल्ला खालिद हा पाकिस्तानी लष्कराच्याही जवळचा आहे. तो लष्करी अधिकार्‍यांना पूर्ण पाठिंबा देतो. तो पाकिस्तानी सैनिकांना भारताविरुद्ध भडकावतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन महिन्यांपूर्वी तो पाकिस्तानमधील पंजाबमधील कंगनपूरला पोहोचला होता. येथे त्याला पाकिस्तानी लष्कराचे कर्नल जाहिद जरीन खट्टक यांनी जिहादी भाषण देण्यासाठी बोलावले होते. तेथे त्याने पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकावले. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे ‘आयएसआय’ आणि पाकिस्तानी लष्कराच्या बैठकीत तो २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू, असे म्हणाला होता. आगामी काळात ‘मुजाहिदीन’ हल्ले तीव्र होतील, असेही त्याने म्हटले होते. 
 
सैफुल्ला खालिद गेल्या वर्षी अबोटाबादच्या जंगलातील दहशतवादी छावणीत उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला होता. या शिबिरात शेकडो पाकिस्तानी मुले सहभागी झाली होती. ‘लष्कर-ए-तोयबा’च्या राजकीय शाखा ‘पीएमएमएल’ आणि ‘एसएमएल’ने याचे आयोजन केले होते. दहशतवादी हल्ल्यांसाठी या कॅम्पमधून मुलांची निवड करण्यात आली होती. या मुलांना टार्गेट किलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले होते. येथे सैफुल्लाने भारताविरुद्ध प्रक्षोभक  भाषण करून मुलांना भडकवले होते. या मुलांनी पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने सीमेपलीकडून घुसखोरी केल्याचेही समोर आले आहे. आता भारताच्या कठोर कारवाईची धास्ती पाकिस्तानला असल्याने त्यांचेहवाई दल तयारीत आहे. भारत सीमेपार कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून, जगाचाही भारताला पाठिंबा आहे.

Related Articles